केमोथेरेपीनंतर केसगळतीची चिंता नाही; कॅन्सरग्रस्तांचे केस वाचवण्याचा मार्ग सापडला

केमोथेरेपीनंतर केसगळतीची चिंता नाही; कॅन्सरग्रस्तांचे केस वाचवण्याचा मार्ग सापडला

या थेरेपीमुळे कॅन्सर (cancer) रुग्णांची फक्त केसगळती थांबणार नाही तर नवे केस उगवण्यासही मदत होणार आहे.

मुंबई, 27  जानेवारी : कॅन्सर (cancer) म्हटलं की केमोथेरेपी (chemotherapy) आली आणि केमोथेरेपी म्हणजे केसगळती (hair loss). केमोथेरेपीचा केसांवर दुष्परिणाम (side effect) होतो. ही थेरेपी घेतल्यांतर रुग्णाचे केस गळतात. किंबहुना टक्कलही पडतं. पण आता ही समस्या उद्भवणार नाही. कारण कॅन्सरग्रस्तांचे केस वाचवणारी थेरेपी आली आहे. त्यामुळे केस गळणार नाहीत. ही थेरेपी कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार आहे.

केमोथेरेपीचा केसांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी क्यूआर 678 ही थेरेपी आली आहे. क्यूआर 678 हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले त्वचेतील घटक.  त्यामुळे  क्यूआर 678 ही थेरेपी अंतर्गत  केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले हे रेणू त्वचेतून देता येतात.  द एस्थेटिक क्लिनिक्सचे डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी शोधलेल्या या थेरेपीचा अभ्यास करण्यात आला.

संशोधनासाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील 20 महिला निवडण्यात आल्या. दर 3 आठवड्यांनी प्रत्येकी 8 सत्रं यानुसार रुग्णांच्या टाळूवर क्यूआर 678 हे सोल्युशन लावण्यात आलं. मूल्यमापन करण्यासाठी जागतिक प्रमाणित फोटोग्राफीचा वापर करून 8 सत्रांनंतर सुधारणा नोंदवण्यात आली. 20 महिलांमध्ये 11.66 कमी व्हेलस हेअर, 13.77 अधिक टर्मिनल हेअर आढळल्याचं आणि हेअर शाफ्ट व्यास बेसलाइनपेक्षा 2.86 μm रुंद असल्याचं दिसून आलं. क्यूआर  678 हेअर ग्रोथ फॅक्टर फॉर्म्युलेशन प्रभावी ठरत आहे, असा निष्कर्ष या संशोधनामार्फत काढण्यात आला.

 

द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या, “कर्करोगावरील उपचारांच्या माध्यमातून एका टप्प्या पलीकडे केस पुन्हा उगवणं शक्य नाही. क्यूआर 678 केवळ केसगळती थांबवत नाही, तर नवीन केस उगवण्यासाठीही फायदेशीर आहे. या उपचारपद्धतीत वाढीसाठी आवश्यक असे काही घटक डोक्यावरील  त्वचेतून इंजेक्शनद्वारे दिले जातात. यामुळे आपल्याला हवा तसा आणि प्रभावी परिणाम साधता येतो, जो मूळपेशी किंवा प्लेटलेट समृद्ध प्लाझ्मा (पीआरपी) यांसारख्या तुलनेने निवडीला कमी वाव असलेल्या उपचारपद्धतीत साधता येत नाही”

सीनिअर कॉस्मेटिक सर्जन डॉ देबराज शोम म्हणाले, “केमोथेरपीचे साइड इफेक्टस होतात. मात्र बरे होण्यासाठी पर्याय नसतो. याच काळात रुग्ण मानसिक आणि शारीरिक पातळीवर खचण्याची शक्यता असते. डोक्यावरील विरळ होत जाणारे केस आणि बारीक होणारं शरीर रुग्णाला अस्वस्थ करते. त्यात रुग्ण महिला असेल तर जास्तच त्रास होतो. या पार्श्वभूमीवर क्यूआर  678 थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते”